जॅकवेलमधून १९ मार्चपासून होणार पाण्याचा उपसा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला आता वेग आला असून येत्या १९ मार्चपासून जॅकवेलमधून पाणी उपसा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शनिवारी (दि. ७) झालेल्या सुनावणीत कंत्राटदाराने ही ग्वाही दिली. दरम्यान, १६ मार्च रोजी न्यायालय नियुक्त समिती प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार असून, त्याचा अहवाल १७ मार्चला सादर करण्याचे आदेश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांनी दिले आहेत.
सुनावणी दरम्यान सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे बांनी जलवाहिनीच्या ’चेअर’चे (आधारस्तंभ) काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर कंत्राटदार कंपनीतर्फे जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. रमेश धोर्डे यांनी सांगितले की, दुरुस्तीची सर्व कामे पुढील १० दिवसांत पूर्ण केली जातील. 
तसेच १९ मार्चपासून जॅकवेल कार्यान्वित होऊन पाणी उपसा सुरू होईल, असेही त्यांनी न्यायालयाला आश्वस्त केले.